No Result
View All Result
पंढरपूर : भक्तीचा गंध, फुलांचा दरवळ अन् रंगांची मनमोहक उधळण… अशा प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात विजयादशमीच्या निमित्ताने पंढरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने खुलून गेले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभपर्वावर विविधरंगी सुगंधी फुले आणि शोभिवंत पानांच्या कलात्मक रचनेतून मंदिराला नवे रूप प्राप्त झाले. या नयनरम्य पुष्पसजावटीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आनंदात भर पडली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात सण-उत्सवांच्या निमित्ताने विविध प्रकारची सजावट करण्यात येते. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर यंदाही मंदिर परिसरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. झेंडूच्या पिवळ्या-केशरी छटा, गुलाबाचे मोहक सौंदर्य, शेवंतीचा दरवळ आणि ऑर्किडच्या नाजूक फुलांनी मंदिराच्या सौंदर्यात भर घातली. रंगीबेरंगी फुलांच्या सुबक मांडणीमुळे संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
या सजावटीसाठी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, सूर्यफूल, तगर, गुलछडी, लक्ष्मी कमळ, ब्लू डेझी आणि पिंक डेझी अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर जिप्सोफिला, कमिनी, अशोकाची पाने, मनीप्लांट आणि ड्रॅसिना यांसारख्या शोभिवंत पानांची कलात्मक सांगड घालण्यात आली. फुलांची आकर्षक रंगसंगती आणि सुबक रचनेमुळे मंदिराच्या सजावटीला विशेष उठाव प्राप्त झाला.
दसऱ्याच्या मंगलमय पर्वावर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना या पुष्पसजावटीचे अनोखे सौंदर्य अनुभवायला मिळत आहे. फुलांच्या सुगंधाने दरवळणारा मंदिर परिसर आणि भक्तिमय वातावरण यांचा सुंदर मिलाफ साधला गेला आहे. विठ्ठलनामाच्या गजरात रंगलेल्या पंढरीत फुलांच्या या मनमोहक आरासीने उत्सवाचा आनंद द्विगुणित केला आहे.
पुण्यातील भाविकाकडून विठुरायाच्या चरणी पुष्पसेवा!
विजयादशमीनिमित्त मंदिरात करण्यात आलेल्या या आकर्षक पुष्पसजावटीमागे पुणे येथील राम जांभुळकर यांची सेवाभावी भावना आहे. त्यांनी कोणताही मोबदला न घेता स्वखर्चाने ही सजावट उपलब्ध करून दिली. विठुरायावरील श्रद्धा आणि भक्तीभावातून साकारलेल्या या पुष्पसेवेमुळे मंदिराच्या सौंदर्यात विशेष भर पडली आहे. उत्सवाच्या निमित्ताने फुलांच्या माध्यमातून विठ्ठलचरणी अर्पण केलेली ही सेवा भाविकांसाठीही आकर्षण ठरत आहे. या पुष्पसजावटीची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली
No Result
View All Result