सोलापूर | : केवळ भव्यता, आकर्षक रोषणाई आणि देखाव्यांच्या झगमगाटापेक्षा सामाजिक प्रबोधनाला प्राधान्य देण्याची परंपरा सोलापूरच्या गणेशोत्सव मंडळांनी यंदाही कायम ठेवली आहे. विजापूर रोड येथील नामांकित पंचमुखी कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाने यंदा अन्न भेसळ आणि बनावट औषधांच्या गंभीर समस्येवर भाष्य करणारा जिवंत देखावा साकारला आहे. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ हा प्रभावी संदेश देणारा हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या दूध, खाद्यतेल, मसाले, डाळी, तूप आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय आहे. भेसळयुक्त किंवा दूषित अन्नाचे सेवन आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते.
त्याचप्रमाणे बनावट अथवा निकृष्ट औषधांमुळे उपचारांवर परिणाम होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.याच सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण पंचमुखी मंडळाच्या देखाव्यात करण्यात आले आहे. अन्नपदार्थ खरेदी करताना गुणवत्ता तपासणे, औषधे अधिकृत ठिकाणाहून घेणे आणि संशयास्पद उत्पादनांबाबत सजग राहणे, असा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ ठरू शकतो, हे पंचमुखी मंडळाने आपल्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये अन्न व औषधांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा होत असून, ‘सजग ग्राहक, सुरक्षित समाज’ या भावनेला चालना मिळत आहे.
देखाव्यात नेमके काय? या देखाव्यामध्ये नागरिकांना अन्नपदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी, घरगुती सोप्या पद्धतींचा वापर करून भेसळीची चाचणी कशी करावी आणि भेसळ आढळल्यास अन्न व औषध प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार कशी नोंदवावी, याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच भेसळयुक्त अन्न आणि अप्रमाणित औषधांमुळे शरीरावर होणारे घातक परिणाम दृकश्राव्य माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
“सण-उत्सव हे समाजाला दिशा देणारे माध्यम असावेत. बाजारात अन्नधान्य व औषधांमधील भेसळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रत्येक ग्राहकाने सतर्क आणि सजग राहणे काळाची गरज आहे. हाच संदेश घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने आम्ही हा देखावा साकारला आहे.” – मिथुन राठोड, अध्यक्ष, पंचमुखी तरुण मंडळ, सोलापूर.