सोलापूर : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा पवित्र सण रक्षाबंधन यंदा शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा शुक्रवारच्या सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांपर्यंत आहे. धर्मशास्त्रानुसार सूर्योदयानंतर सहा घटी अर्थात २ तास २४ मिनिटांपेक्षा अधिक काळ पौर्णिमा असल्यास त्याच दिवशी रक्षाबंधन करावे, असा नियम आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजीच साजरे करणे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे रक्षाबंधनासाठी विशिष्ट मुहूर्ताची सक्ती नसून संपूर्ण दिवस शुभ मानला जात आहे. त्यामुळे भावाला राखी बांधण्यासाठी दिवसभरातील कोणताही सोयीचा वेळ निवडता येणार आहे. बहिणींकडून भावाला औक्षण करून राखी बांधली जाईल, तर भाऊ बहिणीला प्रेमाची भेट देऊन तिच्या संरक्षणाची जबाबदारी जपण्याचा संकल्प करणार आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक राख्या, भेटवस्तू आणि मिठाईची दुकाने सजली असून खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी शहरात रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.