सोलापूर | जुळे सोलापूर येथील डी-मार्ट परिसरासमोरील फळविक्रेत्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक २६ चे नगरसेवक दीपक जमादार यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी अग्निशमन अधीक्षक राकेश साळुंखे यांच्याशी तातडीने दूरध्वनीवरून संपर्क साधत अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले.नगरसेवक दीपक जमादार हे प्रभागातील विविध नागरी समस्यांची पाहणी करत असताना काही नागरिकांनी त्यांना दूरध्वनीवरून डी-मार्ट परिसरातील दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली. आगीमुळे परिसरातील फळविक्रीची दुकाने तसेच इतर काही दुकानांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.आगीचा भडका वाढल्यास आसपासच्या दुकानांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जमादार यांनी अग्निशमन विभागाशी समन्वय साधला. तसेच आग अधिक पसरू नये, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये आणि परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवता यावे, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर मिळालेली माहिती आणि तातडीने केलेली कार्यवाही महत्त्वाची ठरते. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक दीपक जमादार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाशी संपर्क साधला आणि प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या या तत्परतेमुळे आपत्कालीन परिस्थितीत लोकप्रतिनिधींची जबाबदारी पुन्हा अधोरेखित झाली आहे.दरम्यान, आगीमुळे नुकसान झालेल्या दुकानदारांना दिलासा मिळावा, नुकसानीची पाहणी व्हावी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











