पंढरपूर : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शनिवारी (४ जुलै) पंढरपूर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते धर्मशाळा भक्तनिवासाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यादरम्यान त्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार असून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सुनेत्रा पवार सकाळी १०.३० वाजता बारामती येथून मोटारीने पंढरपूरकडे रवाना होतील. दुपारी १२.३० वाजता त्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल होऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतील. त्यानंतर त्या इसबावी (मलपे चौक) येथे आगमन करतील. दुपारी १ वाजता धर्मशाळा भक्तनिवासाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर त्या शासकीय विश्रामगृहात काही काळ राखीव राहतील. दौरा पूर्ण झाल्यानंतर दुपारी २ वाजता त्या बारामतीकडे प्रयाण करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, मंदिर परिसर व कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे.