सोलापूर : एस.पी. न्युरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कथितपणे विनापरवाना प्रवेश करून कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी न्युरोलॉजिस्ट डॉ. शोनाली अरविंद वळसंगकर यांच्याविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उमा शिरीष वळसंगकर (रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, डॉ. शोनाली वळसंगकर यांनी हॉस्पिटलमध्ये विनापरवाना प्रवेश करून तेथील कामकाज पाहण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना काम करण्यास विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ, अरेरावी करत बांधून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून सदर बझार पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.