ट्रेड युनियनचे महापौर कोंड्याल यांना निवेदन
सोलापूर : विभागातील बिगारी, झाडूवाले व सफाई कर्मचारी अशा १५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्यावतीने महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृहनेते नरेंद्र काळे यांना निवेदन देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन यावेळी कामगार नेते तथा युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची व्यथा पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. घनकचरा व्यवस्थापन विभागातील संबंधित १५ कर्मचाऱ्यांची ९ सप्टेंबर २०२५ रोजी सुनावणी झाली होती. दैनंदिन कामात हलगर्जीपणा करणे तसेच सतत विनापरवाना

गैरहजर राहणे, या कारणांवरून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार असलेली नोकरी गेल्याने महागाईच्या काळात या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही होत असल्याचे सदाफुले यांनी सांगितले. त्यामुळे मानवी दृष्टिकोनातून संबंधित कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देऊन त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई माफ करावी आणि त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच या १५ कर्मचाऱ्यांचा विषय महापालिकेच्या स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मांडून त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती युनियनच्यावतीने करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावर महापौर कोंड्याल व सभागृहनेते काळे यांनी संबंधित १५ बडतर्फ कर्मचाऱ्यांचा विषय आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी ट्रेड युनियनचे इक्बाल तडकल, अरुण म्हेत्रे, रामचंद्र चंदनशिवे, सुनील शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.











