सोलापूर : श्रावण महिन्याची सुरुवात होताच सोलापूर नगरी हरहर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. आज पहिल्या श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आल्याने सोलापूरकरांच्या आनंदाला व भक्तीला उधाण आले आहे. पहाटेपासूनच शहरातील प्रमुख शिव मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे., ‘ओम नमः शिवाय’च्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे.
शहरातील आराध्य दैवत श्रीशिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरामध्ये पहाटे ४:३० ते रात्री १२:३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सकाळी ७:०० वाजता श्री सिद्धेश्वर महाराज पुराण, रुद्राभिषेक व अभिषेक सोहळा पार पडला. सकाळी ८:३० वाजता योग समाधीजवळ सामूहिक ‘ॐ नमः शिवाय’ जपाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता आकर्षक पालखी सोहळा, विशेष पूजा व सजावट संपन्न होणार असून पहिल्या शिवमुठीचा (तांदूळ) महापूजेचा मान पुजारी शिवशंकर हब्बू यांच्याकडे आहे.
तसेच, बळीवेस आणि अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ हॉटगी मठातील पंचमुखी परमेश्वर मंदिरात सकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक, रुद्राभिषेक, गंगा आरती व भस्म आरती संपन्न झाली. काशीपीठ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामींचे तपोनुष्ठान आणि सकाळी ९ नंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. पहिल्या श्रावण सोमवाराचे औचित्य साधून महिलांची गर्दी विशेष उल्लेखनीय ठरली असून, सर्वांनी मनोभावे शिवाची पूजा करत बिल्वपत्रांची अर्पण केली.
तसेच, बाळीवेस येथील प्रसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरातही विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. पहाटे काकडा आरतीनंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत रुद्राभिषेक व १०८ नामावली पठन झाले. याशिवाय ११ लिटर उसाचा रस व दुधाचा अभिषेक, ६४ किलो तांदूळ, ५ किलो मसूर आणि ५ किलो मुगाची ‘अक्कीपूजा’ करण्यात आली. रात्री ८ वाजता मंदिराचा पालखी सोहळा व नंदीध्वज मिरवणूक निघणार असल्याची माहिती विनोद हिरेहब्बू यांनी दिली.
योग समाधीस फुलांची मनोहारी सजावट पहिल्या श्रावण सोमवाराचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अत्यंत आकर्षक आणि मनोहारी फुलांची सजावट करण्यात आली. ही भव्य सजावट साकारण्यासाठी तब्बल १६ कारागीरांनी परिश्रम घेतले आहेत.
या विशेष सजावटीसाठी झेंडू: ४०० किलो गुलाब: १०० किलो, शेवंती: साडेतीनशे किलो, गुलछडीसह विविध सुवासिक फुलांचा वापर करण्यात आला आहे. भारत फ्लॉवर स्टॉलचे मंजुनाथ तेलसंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही योग समाधीची सजावट केली असून, भांड्याचे व्यापारी चंद्रकांत बाळी यांनी ती श्रीचरणी अर्पण केली आहे. पहिल्या श्रावण सोमवार व नागपंचमीच्या योगावर योग समाधीचे हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.