सोलापूर : विधान परिषदेवर नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) नवनिर्वाचित आमदार अनिकेत सुनील तटकरे यांचा ‘ईच्छा भगवंताची’ परिवाराच्या वतीने सोलापुरी पद्धतीने सत्कार करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ चे भाजप नगरसेवक किसन जाधव यांनी रायगड येथील गीता बाग, सुतारवाडी येथे तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हा सन्मान केला.
यावेळी किसन जाधव यांनी अनिकेत तटकरे यांना ‘अस्सल सोलापुरी आमदार’ असा उल्लेख असलेला फेटा बांधून भला मोठा पुष्पहार घातला. तसेच प्रसिद्ध सोलापुरी चादर भेट देऊन त्यांचा गौरव केला. या चादरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांना पेढा भरवत असतानाचा प्रसंग, तसेच खासदार सुनील तटकरे व महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिमा विणण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या भेटीमुळे अनिकेत तटकरे भारावून गेले. सोलापुरी चादरीला जगभरात वेगळी ओळख असून, आपल्या कुटुंबाचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा विशेष क्षण या कलाकृतीच्या माध्यमातून जतन करून भेट दिल्याबद्दल त्यांनी किसन जाधव यांचे आभार मानले. सोलापूरच्या कलेची आणि सोलापुरी चादरीची ओळख अशा अनोख्या पद्धतीने जपल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचाही किसन जाधव यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. किसन जाधव हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. अलीकडील निवडणुकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवून नगरसेवकपद मिळविले. पक्ष बदलला असला तरी तटकरे परिवाराशी असलेले जुने ऋणानुबंध त्यांनी कायम जपले आहेत. त्यामुळे हा सत्कार पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कौटुंबिक जिव्हाळा आणि जुन्या संबंधांचा सन्मान ठरला. याप्रसंगी युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड, माणिक कांबळे, अजय बिरवटकर, हुलगप्पा शासम, पवन बेरे, वैभव प्रचंडे, वसीम रंगरेज आदी उपस्थित होते.
दरम्यान, किसन जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांना सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातील काही निवेदनेही दिली. महायुतीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत असून, आगामी काळातही सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका राहील, असे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.