सोलापूर : जन्मजात किंवा गंभीर श्रवणदोषामुळे संवादाच्या अडचणींचा सामना करणाऱ्या बालकांसह प्रौढ रुग्णांसाठी सोलापुरातच आधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. आधार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शहरातील पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू करण्यात आले असून, कान-नाक-घसा विभागातील अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
डॉ. किशन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या केंद्रात कॉक्लिअर इम्प्लांटसोबतच श्रवण तपासणी व मूल्यांकन, ऑडिओलॉजी तसेच स्पीच आणि लँग्वेज थेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः लहान मुलांमधील श्रवणदोषाचे वेळेत निदान करून त्यावर योग्य उपचार करण्याला केंद्रामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.कॉक्लिअर इम्प्लांटनंतर मुलांच्या भाषिक आणि संवाद कौशल्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या स्पीच-लँग्वेज रिहॅबिलिटेशनवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
त्यामुळे उपचारासोबत पुनर्वसनाची प्रक्रियाही स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.याशिवाय झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या Obstructive Sleep Apnea आजारावरील शस्त्रक्रिया तसेच आवाजातील समस्या आणि स्वरयंत्राच्या विविध विकारांवर Microlaryngeal Surgery सारख्या आधुनिक शस्त्रक्रिया सुविधाही या केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहेत.आतापर्यंत अशा प्रकारच्या उपचारांसाठी सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागातील अनेक रुग्णांना पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. आता अत्याधुनिक निदान, शस्त्रक्रिया आणि उपचार सुविधा सोलापुरातच उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, प्रवासाचा त्रास आणि उपचारासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.सोलापूर आणि परिसरातील श्रवणदोष असलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार असून, विशेषतः बालकांच्या श्रवणविषयक समस्यांचे लवकर निदान व योग्य वेळी उपचार करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.