सोलापूर : राज्यातील शिक्षण विभागात लवकरच मोठे प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता असून, जिल्हा शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शिक्षण विभागाचे उपसचिव मोईन तहसीलदार यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागात प्रशासकीय कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी तसेच दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याचे समजते. शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या बदल्यांद्वारे प्रशासन अधिक गतिमान आणि उत्तरदायी करण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, बदल्यांचे आदेश लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूरसह राज्यभरातील शिक्षण विभागात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, बदल्यांबाबत अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होणार असून, शिक्षण विभागातील या घडामोडींकडे शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.