३ ऑक्टोबरपासून देवीची मंचकी निद्रा
तुळजापूर, दि. १- श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा ११ ऑक्टोबरपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार असून, ३ ऑक्टोबरपासून देवींची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
सैनिकी विद्यालयात झालेल्या आढावा बैठकीस पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नवरात्रोत्सव काळात अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी विद्युत विभागाला २४ तास वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, भाविकांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक व मार्गदर्शक फलक उभारण्यात आले आहेत.
भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सहा प्रमुख मार्गावर २२ प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नगर परिषदेच्या माध्यमातून मंडप, दर्शन मंडप, चप्पल ठेवण्याची व्यवस्था, सामान ठेवण्यासाठी कपाट सुविधा, भवानी कुंड येथे स्नानगृह, भाविकांसाठी विश्रामकक्ष तसेच २०० फिरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय शुध्द पिण्याचे पाणी आणि भवानी कुंड परिसरात स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.