गिडुगु व्यंकटराम मूर्ती, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन; विद्यार्थ्यांकडून कविता सादरीकरण
सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत प्रसिद्ध तेलुगू साहित्यिक गिडुगु व्यंकटराम मूर्ती तसेच हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त तेलुगू भाषा दिन आणि राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी तेलुगू कविता सादर करत भाषेचा गौरव केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त संगीता इंदापुरे होत्या. मनपा प्राथमिक शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक भास्कर मदनाल, मनपा प्राथमिक शाळा क्र. ४ च्या मुख्याध्यापिका नागऋषी परिमला तसेच कुचन प्रशालेच्या तेलुगू विभागाच्या माजी सहशिक्षिका अश्वथनारायणम्मा यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते गिडुगु व्यंकटराम मूर्ती आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविकात मातृभाषेचे महत्त्व विशद केले. यावेळी तेलुगू भाषा दिन व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.इयत्ता दहावी ‘ग’मधील विद्या भिमरथी आणि लक्ष्मी माचर्ला यांनी तेलुगू कविता सादर केल्या, तर तुलसी गंधम हिने मनोगत व्यक्त केले. सहशिक्षिका प्रियंका महिंद्रकर यांनी ‘वंदनीय गुरुवर्या’ ही स्वलिखित कविता सादर केली. अध्यक्षीय समारोपात संगीता इंदापुरे यांनी तेलुगू भाषेची महती सांगत विद्यार्थ्यांना भाषा संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगु, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, क्रीडा शिक्षक सागर गायकवाड, गोकुळ यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तेलुगू शिक्षिका प्रतिभा इराबत्ती, प्रियंका महिंद्रकर व गायत्री लछमापूरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रियंका महिंद्रकर यांनी केले, तर गायत्री लछमापूरे यांनी आभार मानले.