सोलापूर : सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गुरुवारी आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पेन्शन प्रस्ताव, फंडाचे प्रस्ताव, मुख्याध्यापक मान्यता, वैयक्तिक मान्यता यासह अनेक कामे प्रलंबित असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी मांडल्या. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी चांगलेच खडसावले. शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी त्यांचे फोन न उचलणे, कार्यालयीन कामासाठी आलेल्या शिक्षकांशी हुज्जत घालणे अथवा त्यांना समाधानकारक प्रतिसाद न देणे, असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. शिक्षक वारंवार संपर्क साधत असताना त्यांचे फोन न उचलणे किंवा कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालणे योग्य नाही. कोणत्याही शिक्षक-कर्मचाऱ्याचे काम विनाकारण प्रलंबित ठेवू नये. प्रत्येक प्रकरणाची वेळेत आणि पारदर्शकपणे कार्यवाही झाली पाहिजे, अशा कडक सूचना आमदार आसगांवकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित प्रस्तावांवर आवश्यक त्या सह्या करून घेण्यात आल्या. तसेच रामचंद्र देवकर यांना भारती विद्यापीठ, सोलापूर येथील प्राचार्य पदाची मान्यता तात्काळ देण्यात आली. “शिक्षक हे शिक्षणव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यालयीन पातळीवर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. शिक्षकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावणे किंवा त्यांना त्रास होईल, अशी कोणतीही कार्यपद्धती स्वीकारली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश आमदार आसगांवकर यांनी दिला. बैठकीस श्रावण बिराजदार, नागेश बिराजदार, चलगेरी सर, कृष्णदेव बेहेरे, सुभाष धुळे, रामचंद्र जानकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित.