ठेवी, बाजार फी, कोट्यवधींचे कंत्राटी खर्च अन् लेखापरीक्षण आक्षेपांची माहिती मागवली; संचालकांचे सचिवांना स्मरणपत्र
सोलापूर, शहर प्रतिनिधी. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील उत्पन्न-खर्च, ताळेबंद आणि ट्रायल बॅलन्समधील महत्त्वाच्या आर्थिक बाबींची सविस्तर माहिती व संबंधित कागदपत्रे संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी उपलब्ध करून देण्याची मागणी संचालक अतुल हरी गायकरवाड आणि मनिष सुभाष देशमुख यांनी केली आहे. यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी पत्र देऊनही माहिती उपलब्ध न झाल्याने त्यांनी पुन्हा स्मरणपत्र देत आर्थिक बाबींचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी माहिती तातडीने देण्याची मागणी केली आहे.
संचालकांनी बाजार समितीच्या सचिवांना दिलेल्या पत्रात मुदत ठेवी व बँक गुंतवणुकीचा तपशील मागितला आहे. यामध्ये मूळ रक्कम, ठेव दिनांक, व्याजदर, मुदतपूर्ती दिनांक, मुदतपूर्तीची रक्कम, प्राप्त व्याज तसेच संबंधित ठराव व मंजुरीच्या प्रतींचा समावेश आहे.

बाजार फीतील घट-वाढीचाही हिशेब मागितला
२०२५-२६ या आर्थिक वर्षातील बाजार फी उत्पन्नातील वाढ-घट, भुसार, कांदा, फळे-भाजीपाला, फूल आदी विभागनिहाय आवक आणि वसुलीचा तपशीलही मागविण्यात आला आहे. त्यासोबत ३१ मार्च २०२६ रोजीची एकूण थकबाकी आणि थकबाकीदारांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.बाजार समितीच्या रस्ते, डांबरीकरण, काँक्रीट, ड्रेनेज, शेड, इमारत तसेच मूलभूत सोयी-सुविधांवरील कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटी खर्चाचा कामनिहाय तपशील मागविण्यात आला आहे. संबंधित कामांना मिळालेली प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक, निविदा, वर्क ऑर्डर आणि अंतिम बिलांच्या प्रतीही उपलब्ध करून देण्याची मागणी संचालकांनी केली आहे.
जुनी येणी अन् ‘राइट ऑफ’वरही लक्ष
३१ मार्च २०२६ रोजी प्रलंबित असलेल्या Advances, Deposits, अनामत आणि इतर देणी-येणी यांचे ‘एजिंग स्टेटमेंट’ मागण्यात आले आहे. यातील कोणतीही जुनी रक्कम ‘राइट ऑफ’ अथवा ॲडजस्टमेंट करण्यात आली असल्यास त्यासंबंधीचा ठराव व मंजुरीची माहितीही मागविण्यात आली आहे.

लेखापरीक्षणातील आक्षेपांचे काय?
मागील आर्थिक वर्षांपासून प्रलंबित असलेले लेखापरीक्षण आक्षेप तसेच २०२४-२५ च्या लेखापरीक्षणातील दोषदुरुस्ती अहवालाची माहितीही संचालकांनी मागितली आहे. मात्र, या पत्रास अद्याप लेखी उत्तर अथवा मागविण्यात आलेली माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे. बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांशी आणि आर्थिक स्थितीशी संबंधित बाबी असल्याने संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यापूर्वी वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे संचालकांनी म्हटले आहे. अपूर्ण माहितीच्या आधारे आर्थिक बाबींवर निर्णय घेणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आवश्यक माहिती, स्पष्टीकरणे आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती आगामी संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.











