No Result
View All Result
सोलापूर : भाजपमध्ये जुने आणि नवे यांच्यातील वाद सुरू असून, पक्षाच्या निष्ठावंतांना सत्तेचा आस्वाद घेता येत नाही. सर्व काही ‘मीच खाईन’ या भूमिकेत पालकमंत्री जयकुमार गोरे असल्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षात अस्वस्थता आहे. भाजपच्या निष्ठावंतांचा पालकमंत्र्यांना तीव्र विरोध असून, त्यांच्या विरोधातील टक्केवारीचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा शिवसेना उपनेत्या तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी केला.
शनिवारी सोलापुरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूरच्या भाजपमध्ये असंतोष स्पष्ट दिसत असून, संघटनात्मक पद्धतीने काम करा, पक्षासाठी ताकद लावा आणि नवीन कार्यकारिणी लवकर जाहीर करून काम करणाऱ्यांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सोलापूरची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करून पदे दिली जातील, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला जिल्हाप्रमुख शरणराज कॅंगणाळकर, जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, माजी महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांच्याविरोधातील पुरावे आपण सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर मांडणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले. खासदार संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांची तुलना होऊ शकत नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी उद्धवसेनेवर वारंवार टीका करणाऱ्या खासदार ज्योती वाघमारे यांच्याबाबतही भूमिका स्पष्ट केली. भाजपमधील अंतर्गत नाराजीमुळे आगामी काळात राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No Result
View All Result