No Result
View All Result
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात महत्त्वपूर्ण प्रशासकीय घडामोड घडली असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडील पदभार काढण्यात आला आहे. नव्याने नियुक्त झालेल्या परीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत स्वतंत्र पदभार देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कादर शेख यांचा पदभार काढल्यानंतर त्यांना अन्यत्र पदस्थापना मिळेपर्यंत मुख्यालयी थांबावे लागणार आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तालय, पुणे यांच्याकडून मुख्यालयी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. शासनाचे अपर मुख्य सचिव सिद्धार्थ घोरपडे यांनी शिक्षण आयुक्तांना याबाबत निर्देश दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, नव्याने रुजू झालेल्या परीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत स्वतंत्र पदभार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कारभारात लवकरच नवा बदल होण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर शेख यांच्याकडील पदभार काढण्याचा निर्णय झाल्याने शिक्षण विभागातील चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे. नव्या अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार कोणत्या पद्धतीने चालतो, याकडे शिक्षक व शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
तक्रारींचीही झाली होती चर्चा
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या कार्यपद्धतीविरोधात शिक्षक सेनेच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्यात आल्याचे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
No Result
View All Result