५०-६० सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् आरोपी झाले जेरबंद..
सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील द प्लॅटिनो अपार्टमेंटच्या मीटर रूममधून इलेक्ट्रिक वायरचे बंडल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले वायरचे बंडल तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते ७ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या दरम्यान केएलई शाळेजवळील द प्लॅटिनो अपार्टमेंटच्या मीटर रूममधून वायरचे बंडल चोरीला गेल्याची तक्रार विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड करीत होते. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळासह आसरा चौक, अमन चौक आणि नई जिंदगी परिसरातील तब्बल ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या तपासात आरोपी हे द प्लॅटिनो येथील ठेकेदाराकडे कामाच्या निमित्ताने आले होते. तेथे एक दिवस काम केल्यानंतर त्यांनी संधी साधून आर.आर. केबल कंपनीचे १.५ एमएमचे ४५ बंडल आणि ६ एमएमचे ५ बंडल इलेक्ट्रिक वायर चोरल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सर्फराज अ. वहाब पटवेघर (२२), अनिस उस्मान शेख (२४), रेहान जमील शेख (२०) आणि अमीन युनुस शेख (२२) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशांत वराळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड यांच्या पथकाने केली.