गणेश विसर्जनात अहोरात्र सेवा; संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत, शेतकऱ्यांनाही होणार वाटप
सोलापूर, . गणरायाला निरोप देताना जमा होणारे निर्माल्य थेट कचऱ्यात किंवा जलस्रोतांमध्ये जाण्याऐवजी त्याचे ‘हरित सोन्या’त रूपांतर करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड) आणि सोलापुरातील श्री सदस्यांनी हाती घेतला. शुक्रवारी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीपासून शनिवारी पहाटेपर्यंत तब्बल १८०० श्री सदस्यांनी शहरातील विविध विसर्जन स्थळांवर अहोरात्र सेवा बजावत निर्माल्य संकलन केले. विशेष म्हणजे या निर्माल्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करून वृक्षांसह स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच प्रतिष्ठानचे श्री सदस्य शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांवर तैनात झाले होते. तळे हिप्परगा, विडी घरकुल, सागर चौक, गणपती घाट, विष्णू घाट, कंबर तलावातील तीन गेटसह शहरातील विविध लहान-मोठ्या विसर्जन स्थळांवर श्री सदस्यांनी नागरिकांकडून निर्माल्य स्वीकारून त्याचे संकलन केले. विसर्जन मिरवणुका सुरू असेपर्यंत ही सेवा अखंडपणे सुरू होती.
मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळांवर जमा झालेली फुले, हार, निर्माल्य तसेच अन्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. त्यानंतर संकलित कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिक व अन्य अजैविक कचरा सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांकडे सुपूर्द करण्यात आला. जलप्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन न करता अर्पण करण्यात आलेल्या गणेशमूर्तीही श्री सदस्यांनी सन्मानपूर्वक संकलित केल्या.शेकडो श्री सदस्यांनी कोणताही गाजावाजा न करता तासन्तास विसर्जन स्थळांवर थांबून केलेल्या या सेवेमुळे परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच जलप्रदूषण रोखण्यास हातभार लागला. ‘निर्माल्य कचरा नाही, पर्यावरणासाठी उपयुक्त संसाधन आहे,’ हा संदेश प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून कृतीतून देण्यात आला. शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.
निर्माल्याचे होणार ‘हरित सोनं’
गणेशोत्सवात संकलित झालेल्या निर्माल्याची विल्हेवाट न लावता त्याचा पुनर्वापर करण्यावर प्रतिष्ठानने भर दिला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संकलित फुले, हार व अन्य जैविक निर्माल्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाण्यापासून रोखले जाणार असून, दुसरीकडे त्याच निर्माल्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होणार आहे.
रे नगर, दहिटणेतील वृक्षांना मिळणार खत
निर्माल्यापासून तयार झालेले सेंद्रिय खत रे नगर आणि दहिटणे परिसरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या वृक्षांना घालण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित खत स्थानिक शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे श्री सदस्य ॲड. उमेश भोजने यांनी दिली. त्यामुळे गणेशोत्सवातील निर्माल्याचा शेती आणि वृक्षसंवर्धनासाठी उपयुक्त वापर होणार आहे.