पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने देशभरातील भाविकांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दि. ४ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या विविध पूजांची ऑनलाइन नोंदणी सोमवार (दि. ३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
मंदिर समितीच्या निर्णयानुसार पूजांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे. या सुविधेमुळे देश-विदेशातील विठ्ठल भक्तांना पंढरपुरात प्रत्यक्ष उपस्थित न राहता पूजेचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
या टप्प्यात श्री विठ्ठल नित्यपूजा, श्री रुक्मिणी माता नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य सहभाग योजना या पूजांची नोंदणी उपलब्ध राहणार आहे. सण, उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवसांसाठी बुकिंग करता येणार आहे. या ऑनलाइन सुविधेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आणि देशातील विविध राज्यांतील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समितीने सांगितले. ऑनलाइन नोंदणीदरम्यान अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती, अटी व शर्ती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, भाविकांनी ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.
पूजांसाठी देणगी मूल्य श्री विठ्ठल नित्यपूजा – ₹२५,००० श्री रुक्मिणी माता नित्यपूजा – ₹११,००० पाद्यपूजा – ₹५,००० तुळशी अर्चन पूजा – ₹२,१०० महानैवेद्य सहभाग योजना – ₹७,०००