५५ किमी पालखी मार्गावर ५२ उपचार केंद्रे; ८ रुग्णवाहिका, २० वैद्यकीय अधिकारी, २४२ आशा सेविका सेवेत
पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माढा तालुका आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
माढा तालुक्यातील ५५ किलोमीटर पालखी मार्ग, ८ मुक्काम गावे आणि ३७ मार्गावरील गावांमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध राहणार आहेत. यासाठी २ ग्रामीण रुग्णालये, ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५२ औषध उपचार केंद्रे आणि १७ हिरकणी कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत.आरोग्य विभागाने २० वैद्यकीय अधिकारी, ९ महिला वैद्यकीय अधिकारी, १३ महिला समुदाय आरोग्य अधिकारी (बीएएमएस), १६ आरोग्य सहाय्यक, ५३ आरोग्य सेवक, २४२ आशा सेविका, ५ फिरती वैद्यकीय पथके आणि १० आरोग्य दूत यांची नियुक्ती केली आहे. पालखी मार्गावरील २०४ पालख्या व दिंड्यांवर आरोग्य विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
पालखी मार्गावर सर्वत्र उपचार केंद्रे : श्री संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत निळोबाराय, संत गहिनीनाथ तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखी मार्गावरील विविध गावांमध्ये औषध उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक आणि आशा सेविका कार्यरत राहणार आहेत.
२४ तास रुग्णवाहिका सेवा : कुर्डूवाडी, रोपळे, पिंपळनेर, टेंभुर्णी, परिते, मोडनिंब, उपळाई (बु.) आणि अरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ८ रुग्णवाहिका २४ तास सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी दोन अतिरिक्त १०८ रुग्णवाहिका उपलब्ध राहणार असून चालक आणि संपर्क क्रमांकासह स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
सुरक्षित पिण्याच्या पाण्यावर भर : वारकऱ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पालखी मार्गावर २५९ पाणी स्रोत, ९ टँकर भरण्याची ठिकाणे आणि १०३ टीसीएल (पाणी शुद्धीकरण) बॅग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
फिरती वैद्यकीय पथके सतत कार्यरत : पालखीच्या वेळापत्रकानुसार ५ फिरती वैद्यकीय पथके संपूर्ण मार्गावर कार्यरत राहणार आहेत. ताप, सर्दी, खोकला, निर्जलीकरण, पायांच्या जखमा, ड्रेसिंग, रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आपत्कालीन आजारांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना गरज पडल्यास तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे.
वारीसाठी आरोग्य विभागाची प्रमुख तयारी पालखी मार्ग : ५५ किमी मुक्काम गावे : ८ पालखी मार्गावरील गावे : ३७ग्रामीण रुग्णालये : २ प्राथमिक आरोग्य केंद्रे : ८ औषध उपचार केंद्रे : ५२ हिरकणी कक्ष : १७ फिरती वैद्यकीय पथके : ५ रुग्णवाहिका (१०२) : ८ अतिरिक्त १०८ रुग्णवाहिका : २ वैद्यकीय अधिकारी : २० महिला वैद्यकीय अधिकारी : ९ महिला समुदाय आरोग्य अधिकारी (बीएएमएस) : १३ आरोग्य सहाय्यक : १६आरोग्य सेवक : ५३ आशा सेविका : २४२आरोग्य दूत : १०पालख्या व दिंड्या : २०४